Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू आहे. काल देखील राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. पण आता हळूहळू वादळी पावसाचा जोर कमी होत जाणार आहे.
वादळी पावसाने राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा, हळद, गहू, हरभरा अशा विविध पिकांचे या पावसाने नुकसान केले आहे.
फळबागांचे देखील वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हवामान खात्याने राज्यात आज देखील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज 15 एप्रिलला राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये विक्रमी तापमान वाढ पाहायला मिळतं आहे.
काल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान हे 41 अंश सेल्सिअस एवढे नमूद केले गेले आहे. विशेष म्हणजे हे कालचे देशातील सर्वाधिक तापमान असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे कालं उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव हे सर्वात उष्ण शहर ठरले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर हवेचे एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. कोमोरिन भागातील चक्राकार वाऱ्यांची स्थितीपासून उत्तर कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता तयार होत आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील बीड, धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. मात्र काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळेल तसेच उन्हाचा चटका वाढेल असे सांगितले जात आहे.