Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील खानदेशसहित उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. विशेष बाब अशी की, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष बाब अशी की, हवामान खात्याने आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजे अवकाळी पावसाचे संकट अजून पूर्णपणे नाहीसे झालेले नाही.
अजूनही काही दिवस अवकाळी पाऊस सुरूच राहू शकतो आणि यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाचे मोठे नुकसान होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल-परवा चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील काही गावांमध्ये तुफान गारपीट झाली आहे.
या गारपीटीमुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
तसेच, दक्षिण कर्नाटकपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत देखील एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
या हवामान प्रणालीमुळे सध्या मध्य भारतासह महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार होत असून अवकाळी पाऊस सुरू आहे.
आज अर्थातच 28 फेब्रुवारी 2024 ला देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आज ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.
तसेच विदर्भात आज तुरकळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.