Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
दरम्यान, पुढील 24 तासातही राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कुठे बरसणार मुसळधार पाऊस
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. यानंतर, पावसाने जवळपास सात ते आठ दिवस दडी मारली. मात्र काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने जोरदार कमबॅक केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. कोकणापासून ते विदर्भापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरात पावसाची तीव्रता अधिक राहणार असे म्हटले आहे.
आज उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या सदरील 9 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज उत्तर कोकणातील मुंबई, पालघर, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांनां पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्याची सुरुवात जशी जोरदार पावसाने झाली होती, तसाच आता ऑगस्ट महिन्याचा शेवटही जोरदार पावसाने होणार असा अंदाज आहे. महत्त्वाचे म्हणजे सप्टेंबर च्या सुरुवातीला देखील राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो असे काही हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.