Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यात पावसाचा जोर फारच कमी झाला होता. मात्र आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वधारला आहे. राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या संबंधित भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. या जुलै महिन्यात मात्र राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असा अंदाज समोर आला आहे. परंतु जुलै च्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काल राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस बरसला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने आज अर्थातच आठ जुलैला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसणार असे म्हटले आहे.
राज्यात काही भागात ढगाळ हवामान तयार झाले असून आता पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील घाटमाथा परिसरावर, विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या संबंधित जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच उर्वरित विदर्भात, मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच उर्वरित जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. एकंदरीत आज राज्यातील काही भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे.
निश्चितच जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही भागातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.