Havaman Andaj : जुलै महिन्याच्या शेवटी सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. मोसमी पावसाला गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार सुरुवात झाली असून आता पुन्हा जुलै महिन्यासारखीच परिस्थिती तयार होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. जुलैमध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये अक्षरशः पूरस्थिती तयार झाली होती.
ऑगस्टमध्येही अशीच परिस्थिती तयार होणार अस दिसत आहे. कारण की राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने राज्यातील प्रमुख धरणे भरली असून ओव्हरफ्लो सुरु आहे.
यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी नदी नाल्यांना पूर येणार अन पुन्हा एकदा राज्यातील काही भाग पाण्याखाली जाऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर मध्ये गेल्या महिन्यात जशी पूरजन्य स्थिती होती तशीच स्थिती कायम झाली आहे.
राधानगरी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पंचगंगा धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोल्हापूर प्रमाणेच सांगली आणि सातारा जिल्ह्यातील धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे त्या ठिकाणीही पूरजन्य स्थिती तयार झाली असून सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
शेती पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत. अशातच भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
दरम्यान आता कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तर जोरदार पाऊस होणार आहे, शिवाय विदर्भ आणि मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज आयएमडीकडून समोर आला आहे.
विदर्भ : विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा : धाराशिव अन लातूर जिल्हे वगळता मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र : खानदेश मधील तिन्ही जिल्ह्यांना म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर, नाशिक अहमदनगर या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा या जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची शक्यता असून या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.