Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यात सक्रिय झालेला मान्सून पुन्हा एकदा गायब झाला आहे. पुन्हा एकदा पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे.
यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षत्र अधिक तीव्र होत असल्याने आणि दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस पूरक ठरत असल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
खरंतर यंदा जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात जरूर चांगला पाऊस झाला होता मात्र जून आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
सप्टेंबर महिन्यात सात सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर या काळात राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. पण आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली आहे. म्हणून महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र आहे. अशातच आज विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज विदर्भातील पूर्व भागात पावसाचा अधिक जोर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 15 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून या चार जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ वर्धा, नागपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज नंदूरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या संबंधित जिल्ह्यांसाठी देखील आज यलो अलर्ट बहाल करण्यात आला आहे.
निश्चितच गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला यामुळे दिलासा मिळणार आहे.जर हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी भागातील शेती पिकांना नवीन जीवदान मिळणार आहे.