Havaman Andaj : महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाची चटके अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये दिवसादेखील थंड वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढत आहे. अशातच मात्र राज्यातील हवामानात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात पूर्व मौसमी हंगामातील पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पूर्व मौसमी हंगामातील अवकाळी पावसासाठी आणि गारपिटीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
आज विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने गारपिटीची शक्यता वर्तवली आहे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट आणि मराठवाड्यासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय ?
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दिवसांपूर्वी मराठवाडा आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता निवळली गेली आहे. दुसरीकडे, मराठवाड्यापासून विदर्भ, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी पर्यंत खंडीत वाऱ्यांची स्थिती विरली गेली आहे.
मात्र, हवामान खात्याने असे सांगितले आहे की, छत्तीसगडपासून विदर्भ, कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून आता आपल्या राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
आज अर्थातच 26 फेब्रुवारी रोजी आयएमडीने विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीची शक्यता आहे.
आज विदर्भ विभागातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपिट होईल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच उर्वरित मराठवाड्यातही विजांसह पावसाची शक्यता देण्यात आली आहे.