Havaman Andaj : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घसरण आलेली आहे. यामुळे थंडीचा जोर बऱ्यापैकी कमी झाला असून अशातच आता महाराष्ट्रात उबदार हवामानाची आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच थंडीचा जोर आणखी कमी होणार असा अंदाज असून ढगाळ हवामान आणि पावसाची देखील शक्यता आहे.
एवढेच नाही तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असा एक अंदाज समोर आला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसणार आहे. या हवामानाचा कांदा समवेतच रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच फळबाग पिकांना देखील मोठा फटका बसणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे 26, 27 आणि 28 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता सुद्धा आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्, मराठवाडा तसेच विदर्भ विभागात किरकोळ पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगांव, मालेगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छ.सं.नगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, शेगाव, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी या भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेला आहे.
या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 27 तारखेला मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये गारपिटीसाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते.
नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छ.सं.नगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे असा अंदाज हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेला असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष सावध राहावे आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी आणि पशुधनाची देखील काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिलेला आहे.
खरे तर खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळेल अशी आशा होती.
मात्र आता रब्बी हंगामावर गारपिटीचे संकट ओढावले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आता आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? यावरच रब्बी हंगामातील भवितव्य अवलंबून राहणार आहे.