Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर आले असून तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्रात थंडी परतली आहे. वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा मिळतोय.
राज्यात अनेक ठिकाणी पारा १० अंशांखाली घसरला आहे. एकीकडे थंडी वाढत असतानाच आता राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असा अंदाज समोर येत आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून आज पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 13 जानेवारी पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज ता. १० रोजी उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्रात अर्थातच जळगाव नंदुरबार नाशिक या भागांमध्ये आणि उत्तर कोकणात अर्थातच ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते असे आयएमडी मधील काही तज्ञांनी म्हटलें आहे.
सध्या कोकणात काजू आणि आंब्याच्या बागा फुलोरा अवस्थेमध्ये आहेत. काजू आणि आंब्याच्या बागांना मोहर आलाय अन जर अशा परिस्थितीमध्ये कोकणात पाऊस झाला तर नक्कीच काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.
दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात कांदा लागवड सुरू असून काही भागात कांदा लागवड पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत जर या भागांमध्ये पाऊस झाला तर तेथील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज असला, तरी गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. पण असे असतानाच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान वर्तविली आहे.