Havaman Andaj : महाराष्ट्राला नुकताच अति मुसळधार पावसाचा फटका बसलाय. जास्तीच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती तयार झाली होती. कोल्हापूर, पुणे या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. या भागात पूरस्थिती तयार झाल्याने सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पुराच्या पाण्यामुळे सर्वसामान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर आणि विदर्भात काही ठिकाणी खूपच मुसळधार पाऊस झाला आहे. पण आता पुण्यातील पूरस्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.
मात्र कोल्हापुरात अजूनही पूरस्थिती पाहायला मिळत आहे. तथापि येथील पावसाचा जोर आता आधीच्या तुलनेत थोडासा कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्याच्या विविध भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पासून 31 जुलै 2024 पर्यंत राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये धो धो पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पासून 31 जुलै पर्यंत मराठवाडा विभागातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये अर्थातच छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर तसेच खानदेश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्र म्हणजेच अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या 15 जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.
या काळात येथे जोरदार पाऊस पडणार असा अंदाज समोर आला होता मात्र आता भारतीय हवामान खात्याने नवीन अंदाज जारी केला असून यामध्ये या संबंधित जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मात्र पुढल्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक ऑगस्ट पासून खानदेश वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये यावेळी स्पष्ट केले आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मात्र तीन ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहणार आहे. पण मराठवाड्यातील हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा अधिक राहणार आहे.
एवढेच नाही तर संपूर्ण खानदेश आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 अशा एकूण 14 जिल्ह्यांमध्ये आज पासून तीन ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष बाब अशी की कोकणात ही जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्वच्या सर्व सात जिल्ह्यांमध्ये या कालावधीत अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे.