Havaman Andaj August 2024 : जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायाला मिळाला. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आणि यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईची अक्षरशः तुंबई झाली होती. पुणे, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली.
विदर्भातही काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती तयार झाली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान केले आहे. उभ्या पिकात पाणी साचल्याने पीक खराब झाले आहे.
ऐन वाढीच्या अवस्थेत कोसळलेल्या या पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे पीक खराब झाले असून शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस सक्रिय होणार अशी बातमी समोर येत आहे. हवामान खात्यातील निवृत्त शास्त्रज्ञांनी आज पासून पावसाचा जोर वाढणार अशी शक्यता वर्तवली आहे.
एक ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे तीन आणि चार ऑगस्टला महाराष्ट्रात पावसाची तीव्रता सर्वात जास्त पाहायला मिळणार असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत ज्या ठिकाणी पावसाने ओढ दिलेली होती अशा ठिकाणी देखील या काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे. तथापि राज्यात 5 ऑगस्ट नंतर पावसाची उघडीप राहणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस?
आज दक्षिण कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या संबंधित जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
तसेच मुंबई आणि उत्तर कोकणातील ठाणे येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या दोन ऑगस्टला राज्यातील दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
3 ऑगस्टला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या दिवशी मुंबई वगळता संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्याला ऑरेंज कलर देण्यात आला आहे.
4 ऑगस्टला फक्त रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट राहणार आहे. तसेच संपूर्ण कोकण संपूर्ण खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट राहणार आहे. 5 ऑगस्ट नंतर मात्र पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.