Havaman Andaj : महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट या गेल्या तीन महिन्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. जुन आणि ऑगस्ट या दोन महिन्यात तर सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. फक्त जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. हवामान खात्याने चालू सप्टेंबर महिन्यात चांगला जोरदार पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
मात्र सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात देखील राज्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र आता या दुसऱ्या पंधरवड्यात चांगल्या मोठ्या पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. राज्यात आता गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे.
अशातच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र मध्य भारताकडे सरकले असल्याने महाराष्ट्रात आता पाऊस वाढण्यास पोषक हवामान तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
आज राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज असून या पार्श्वभूमीवर या संबंधित भागातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय आज 16 सप्टेंबर रोजी राज्यातील उर्वरित भागासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज महाराष्ट्रातील जवळपास 27 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यापैकी काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 16 सप्टेंबरला राज्यातील उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील नासिक आणि पुणे तसेच विदर्भातील अकोला आणि वाशिम जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज यासंबंधीत जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यासोबतच आज मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी झाला आहे.
उर्वरित राज्यात मात्र विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. एकंदरीत आज महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.