Havaman Andaj 2024 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमधील वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळतं आहे. हवामानात होत असलेल्या या बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला होता.
त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली. याशिवाय मार्च महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.
परिणामी शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे वाया गेले. कष्टकरी शेतकरी बापाचे लाखो रुपये पाण्यात गेले.
पण आता गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे असल्याने शेतकऱ्यांचा जीवात जीव आला आहे. अशातच मात्र प्रसार माध्यमांमध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार अशा बातम्या पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात येत्या तीन ते चार दिवसात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याच्या बातम्या सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.
त्यामुळे खरंच महाराष्ट्रात येत्या तीन-चार दिवसात अवकाळी पावसाची शक्यता आहे का याबाबत शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
यामुळे आज आपण येत्या तीन ते चार दिवसात खरंच महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे की नाही याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी काय म्हटले आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणताय निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे
निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून चार दिवसानंतर अर्थातच 16 मार्चपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
संपूर्ण विदर्भात ढगाळ हवामान राहणार नाही, पण विदर्भातील अमरावती, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या ४ जिल्ह्यांमध्ये १६ ते १९ मार्च दरम्यान ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे. तसेच याच चार जिल्ह्यांमधील काही भागात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नसल्याचे खुळे यांनी यावेळी म्हटले आहे. दुसरीकडे विदर्भातील हे सदर चार जिल्हे वगळता इतर महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचा दावा खुळे यांनी केला आहे.