Havaman Andaj 2024 : महाराष्ट्रात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे. काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट देखील पाहायला मिळाले आहे.
दरम्यान हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता कायम ठेवली आहे. यामुळे उकाड्याने हैराण जनतेला थोडासा दिलासा मिळणार आहे.
खरे तर राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत उघड्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
वाढलेल्या तापमानात आता मात्र अवकाळी पावसाने तडाका दिला आहे. यामुळे थोड्याफार प्रमाणात तापमानात घसरण पाहायला मिळाली आहे. तथापि अजूनही राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.
मात्र पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची देखील शक्यता असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कांदा काढण्याची लगबग पाहायला मिळत आहे. याशिवाय विदर्भ अन मराठवाड्यात हळद काढणीची कामे देखील सुरू आहेत.
दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज दिला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणारा अवकाळी पाऊस आणि कुठं होणार गारपीट ?
8 एप्रिल 2024 : हवामान विभागाने आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, वाशीम आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या सदर दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना आयएमडीने येलो अलर्ट दिला आहे. यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहावे लागणार आहे.
9 एप्रिल 2024 : मंगळवारी अर्थातच नऊ तारखेला राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या विदर्भातील 3 जिल्ह्यात गारपीट होऊ शकते असे आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. या जिल्ह्यात सर्व दूर नाही मात्र काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील उर्वरित जिल्हे, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे आता संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.