Havaman Andaj 2024 : मान्सून 2024 आता अंतिम टप्प्यात आला आहे. तथापि, यंदा भारतातील मान्सूनचा मुक्काम थोडासा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर बऱ्याच अंशी कमी झाला आहे. मुसळधार पावसाने दणका दिल्यानंतर आता राज्यातील हवामान कोरडे झाले आहे.
काही भागांमध्ये ढगाळ हवामान होऊन अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, अनेक राज्यांमधील हवामान बदलणार आहे. येत्या पाच दिवसांत दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य भारतात येत्या पाच दिवसांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर उत्तर आणि पश्चिम भारतात हवामान कोरडे राहील. गेल्या २४ तासांत दक्षिण कर्नाटक आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुढील पाच दिवस ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण द्वीपकल्पीय भारतात, विशेषतः तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत कर्नाटकातील तुमकुरू येथे 15 सेमी, गुजरातमधील वडोदरा येथे 13, जुनागढमध्ये 11 आणि मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे 10 सेमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील पाच दिवस हवामान कसे राहणार ?
1 ऑक्टोबर : तामिळनाडू आणि केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
2 ऑक्टोबर : गांधी जयंतीच्या दिवशी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू आणि केरळमध्येही मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.
3 ऑक्टोबर: IMD ने मणिपूर, नागालँड, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये यलो अलर्ट आहे.
4 ऑक्टोबर : आसाम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तमिळनाडूतही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
5 ऑक्टोबर: दक्षिण-पश्चिम भारतात हवामान सामान्य असेल. पण आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस सुरू राहणार असे बोलले जात आहे.