Havaman Andaj 2024 : गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू आहे. गत दोन दिवसांपासून मात्र पावसाची तीव्रता खूपच वाढली आहे. काल राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाला असून उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची तीव्रता काहीही अधिक होती.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आणखी दोन दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज आणि उद्या राज्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
या अनुषंगाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ठाणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना, मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच उद्या अर्थातच 27 सप्टेंबरला विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना, कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र 28 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
राज्यात पुन्हा एकदा पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आहे. एकंदरीत आज आणि उद्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे. आज राज्यात पावसाची तीव्रता फारच अधिक राहणार असे म्हटले जात आहे.
मात्र उद्या पावसाची तीव्रता थोडी कमी होईल आणि शनिवारपासून पाऊस विश्रांती घेईल असे चित्र आहे. यामुळे ज्या ठिकाणी गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये अधिकचा पाऊस झाला आहे तेथील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
खरे तर गेल्या दोन-तीन दिवसांच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला असून यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
त्यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून आता पाऊस कधी विश्रांती घेणार असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान भारतीय हवामान खात्याने शनिवारपासून पाऊस रजेवर जाणार असा अंदाज दिला आहे.