Havaman Andaj 2024 : मान्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रावरील पावसाचे सावट दूर झालेले नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनोत्तर पावसाने दणका दिला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे पाहायला मिळाले.
हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला होता पण पाऊस काही झाला नाही. मात्र, काल मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काल सांगलीमध्ये जोरदार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलीये. जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. काही भागात पावसाचे प्रमाण फारच अधिक पाहायला मिळाले असून अगदीच ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला जाईल अशी भीती आता व्यक्त होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आजही पावसासाठी पोषक परिस्थिती आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज देखील पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.
आयएमडीने पुढील एक-दोन दिवस महाराष्ट्रात असाच पाऊस सुरू राहणार असे म्हटले आहे. या अनुषंगाने हवामान खात्याकडून अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. आय एम डी ने आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज असून या अनुषंगाने सदरील जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने आज राजधानी मुंबईत अंशत:ढगाळ वातावरण राहील अन काही भागात हलका पाऊस सुद्धा पडू शकतो. राज्यात सध्या ढगाळ हवामान आहे अन ढगाळ हवामानामुळे अजूनही राज्यात म्हणावी तशी थंडी पडलेली नाही.
शिवाय पावसाचे सत्र सुद्धा सुरू आहे. मात्र लवकरच महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार आहे. राज्यातील हवामान कोरडे झाल्यानंतर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार असे बोलले जात आहे.