Havaman Andaj 2024 : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र थांबले आहे. आता राज्यात सकाळी थंडी आणि दिवसा कडक ऊन पडत आहे. यामुळे राज्यात आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
अशातच, मात्र उत्तर भारतात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
उत्तर भारतात पावसाची आणि गारपीटीची शक्यता पाहता महाराष्ट्रात कसे हवामान राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच प्रश्नाचे उत्तर खुळे यांनी दिले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, १० आणि १२ मार्चला म्हणजे उद्या रविवारी आणि मंगळवारी जम्मू काश्मिर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अश्या उत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन भागात एकापाठोपाठ एक दोन पश्चिमी झंजावात प्रवेश करणार आहेत.
या पश्चिमी झंजावातामुळे या सदर राज्यांमध्ये पावसाची आणि गारपीटीची शक्यता आहे. या संबंधित भागात 10 ते 14 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज आहे.
तसेच हे पाच दिवस या भागात काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता देखील आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात हे पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आणि सकाळी थंडी जाणवणार आहे.
या सदर कालावधीमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाची किंवा गारपीटीची कोणतीच शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी यावेळी दिलेला आहे.
तसेच सध्या मुंबईसह संपूर्ण कोकण खानदेशसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या संबंधित 15 जिल्ह्यांमध्ये पहाटेचा गारवा जाणवत आहे.
राज्यातील बहुतांशी भागात मात्र दुपारचे तापमान सरासरी एवढे आहे. दुपारचे कमाल तापमान हे 29 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान नमूद केले जात आहे. यामुळे उन्हाळ्याची चाहूल आता जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे.