Havaman Andaj 2024 : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. एक तर जून ते सप्टेंबर 2023 दरम्यानच्या मान्सून काळात महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस बरसला. यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे.
कमी पावसामुळे शेतकऱ्यांना शेती पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळणार नसल्याचे चित्र आहे. खरिपातील सोयाबीन, कापूस, कांदा इत्यादी महत्त्वाच्या पिकांचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा उत्पादन देखील कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घटणार अशी भीती व्यक्त होत आहे.
अशातच आता राज्यासह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार अशी शक्यता आहे. कारण की भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
याशिवाय आता स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासात देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आज 4 जानेवारी 2024 ला देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, या भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असे स्कायमेटने आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.
तसेच देशातील काही भागात गारपीट होऊ शकते असे देखील सांगितलं आहे. Skymet ने लक्षद्वीपमध्येही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज दिला आहे.
केरळ तसेच तामिळनाडूच्या काही भाग आणि कर्नाटक किनारी भागातही मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
पण देशातील काही भागात अजूनही कडाक्याची थंडी सुरूच राहणार आहे. दरम्यान ज्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेथील शेतकऱ्यांना शेती पिकांची काळजी घेण्याचे आवाहन जाणकार लोकांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले असे.