Havaman Andaj 2023 : महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळाले होते. त्यामुळे रब्बी पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे.
पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे झाले आहे. विशेष बाब म्हणजे सध्या देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. तसेच जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये बर्फ वृष्टी होत आहे.
त्याचा परिणाम म्हणून उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंड वारे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. परिणामी आता राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे.
राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही तापमानात चढ-उतार सुरू आहे. अशातच मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हवामानाने कलाटणी घेतली असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात डिसेंबरच्या शेवटी शेवटी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे.
तसेच नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढणार आहे.
आय एम डी कडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस राज्यातील खानदेश विभागात ढगाळ हवामानासह अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो.
खानदेश मधील शहादा, चोपडा, यावल, रावेर, शिरपूर या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे. या कालावधीत संबंधित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
दुसरीकडे 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे. खानदेश, अहमदनगर, नासिक ते सोलापूर पर्यंतच्या पट्ट्यात ढगाळ हवामान कायम राहू शकते.
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात देखील ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे साहजिकच या संबंधित भागातून थंडीचा जोर काहीसा कमी होणार आहे. तरीही उर्वरित राज्यात थंडी अशीच कायम राहील असे मत काही तज्ञ लोकांनी वर्तवली आहे.
दरम्यान ज्या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना पुन्हा एकदा मोठा फटका बसू शकतो अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.