Havaman Andaj 2023 : मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर राज्यातील कमाल तापमान विक्रमी वाढले होते. रात्रीचे किमान तापमान हे कमी होत नव्हते. यामुळे राज्यातील बहुतांशी भागात ऑक्टोबर हिटचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला. ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील जनता घामाघुन झाली होती.
मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. शिवाय आता कमाल तापमानातही घट होण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून आता गारठा वाढू लागला आहे. राज्यात गुलाबी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. राज्यातील जळगाव, पुणे, नाशिक यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात थंडीची तीव्रता वाढू लागली आहे.
अशातच मात्र राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज समोर आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस पडेल असा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या या संबंधित जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण भारतात देखील गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दक्षिण भारतातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 30 ऑक्टोबर रोजी केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश मध्ये बर्फवृष्टी होणार असा अंदाज आहे.
IMD ने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, केरळ, तामिळनाडू, माहे, पदुच्चेरी येथे आगामी चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दक्षिण कर्नाटकात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे आता हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो का याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.