Havaman Andaj 2023 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ होत आहे. मान्सून माघारी फिरल्यानंतर उष्णता वाढली आहे. खरंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये नेहमीच तापमानात वाढ होत असते. ऑक्टोबर हा महिना संक्रमणाचा महिना असतो.
म्हणजेच या महिन्यात पावसाळा ऋतू संपतो आणि हिवाळ्या ऋतूला सुरुवात होते. अशा या संक्रमणाच्या ऋतूमध्ये तापमानात वाढ होते, उकाडा वाढतो, या महिन्यात ऑक्टोबर हिट चा प्रत्यय येतो. यंदा मात्र ऑक्टोबर हिट नेहमीपेक्षा अधिक तापदायक ठरत आहे.
मान्सून काळात एलनिनोमुळे कमी पाऊस झाला असल्याने यंदाचा ऑक्टोबर महिना हा अधिक तापदायक बनला आहे. नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. अशातच मात्र उकाड्याने हैरान, परेशान जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं कमबॅक होणार आहे.
हवामान विभागाने याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक हवामान तयार झाले आहे. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे आता राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे नागरिकांना तूर्तास ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोणत्या भागात बरसणार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज अर्थातच 15 ऑक्टोबर रोजी, घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विभागात पावसाचं कमबॅक होणार आहे. कोकणातील दक्षिण भागात आणि उत्तर महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यात पाऊस पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.
IMD ने सांगितले की, कोकण मधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात तर उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि जळगाव या 3 जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. आज या संबंधित जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे.
या भागात आज विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच उर्वरित कोकण आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.