Havaman Andaj 2023 : मान्सून 2023 आता अंतिम टप्प्यात आला आहे. यावर्षी मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमीवर उशिराने आगमन झाले. महाराष्ट्रात देखील मान्सून उशिराने पोहोचला. उशिराने मान्सूनचे आगमन झाल्याने जून महिन्यात अपेक्षित पाऊस बरसला नाही. जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली.
यामुळे अगदी सुरुवातीलाच देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचा आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्यात. पण पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला आणि गेल्या दहा ते बारा दशकात जे घडलं होतं ते घडलं.
ऑगस्ट महिन्यात तब्बल 20 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला. यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा राहिला होता. पण सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा राज्यात चांगला पाऊस झाला. आता मान्सून अंतिम टप्प्यात आला असून देशातील बहुतांशी राज्यांमधून मान्सून माघारी फिरत आहे.
आपल्या महाराष्ट्रातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अशातच आता देशात परतीचा पाऊस मुसळधार बरसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज आणि उद्या देशातील बहुतांशी भागांमध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे 8 ऑक्टोबर पर्यंत अर्थातच उद्यापर्यंत देशातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोणत्या भागात बरसणार मुसळधार पाऊस?
पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संबंधित भागांमध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असा अंदाज आहे.
हवामान विभागाने कालपासून महाराष्ट्रातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
महाराष्ट्रात कस राहणार हवामान?
IMD ने सांगितले की, राज्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. पण राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात अनेक ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. अर्थातच महाराष्ट्रात परतीचा पाऊस मुसळधार बरसणार नसल्याचे चित्र आहे.
परंतु राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये आगामी काही तास ढगाळ हवामान आणि ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आता महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला असून आगामी काही तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांशी भागामधून मान्सून माघारी फिरणार आहे.