Havaman an Andaj Maharashtra : गेल्या 15 ते 16 दिवसांपासून सुट्टीवर असलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला होता यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. पण आता गुरुवार रात्रीपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
यामुळे गेल्या कित्येक दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेला हा पाऊस वनव्यामध्ये गारव्यासारखा अनुभव देत आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळाले आहे. खरंतर पावसाला 21 ऑगस्ट नंतर सुरुवात होणार होती.
मात्र त्याआधीच पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आणि राज्यात आता पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात आता 25 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अर्थातच आता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे याबाबत आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तसेच आज अर्थातच 19 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यातील लातूर , धाराशिव, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नासिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. कोकणातही या कालावधीमध्ये पाऊस पडणार असा अंदाज आहे. मुंबई आणि कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.