Harbhra Lagwad : महाराष्ट्रात रब्बी हंगामामध्ये हरभरा आणि गहू या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हरभरा पिका बाबत बोलायचं झालं तर हे एक प्रमुख कडधान्य पीक असून याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होते. महाराष्ट्रात उत्पादित होणारे रब्बी हंगामातील हरभरा हे प्रथम क्रमांकाचे पीक. याचे लागवडीखालील क्षेत्र आपल्या राज्यात फारच उल्लेखनीय असून राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे.
या पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन तर मिळतेच शिवाय हे पीक हवेतील नत्र मोठ्या प्रमाणात शोषून घेते यामुळे पुढील हंगामातील पिकांसाठी याचा फायदा होतो. या पिकाची लागवड केल्यास पुढील पिकास नत्र खताची उपलब्धता होते व जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.
खरंतर महाराष्ट्रात हरभरा लागवडीखालील क्षेत्र उल्लेखनीय आहे मात्र याची लागवड ही आपल्याकडे कोरडवाहू भागात मोठ्या प्रमाणात होते. तसेच काही शेतकरी बांधव याची लागवड बागायती भागातही करत असतात.
दरम्यान आज आपण हरभरा पिकाची पेरणी नेमकी कधी करावी, कोणत्या तारखेपर्यंत हरभऱ्याची पेरणी केली पाहिजे यासंदर्भात कृषी तज्ञांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हरभरा पेरणीची योग्य वेळ कोणती?
जिरायती भागात हरभरा पेरणी करायची असेल तर हरभऱ्याची पेरणी ही सप्टेंबर महिन्यातच सुरू करावी. 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा जिरायती भागातील हरभरा पेरणी करण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट काळ. या काळात जमिनीत ओलावा असतो आणि यामुळे या काळात जिरायती हरभऱ्याची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरूवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायती हरभऱ्याला नक्कीच मोठा फायदा होतो. जिरायती हरभऱ्याची पेरणी करायची असल्यास बियाणे 10 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरावे.
तसेच ज्या शेतकऱ्यांना बागायती हरभऱ्याची पेरणी करायची असेल त्यांनी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात याची पेरणी करावी. बागायती भागात पाणी देण्याची सोय असल्याने हा काळ हरभरा पेरणीसाठी सर्वोत्कृष्ट असतो.
ज्या शेतकऱ्यांना बागायती हरभऱ्याची पेरणी करायची असेल त्यांनी पेरणी करताना बियाणे पाच सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरावे. हरभरा पेरणी उशिराने केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते यामुळे 10 नोव्हेंबर पर्यंतच हरभऱ्याची पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
१० नोव्हेंबर नंतर १५ दिवसांनी व ३० दिवसांनी उशीरा हरभऱ्याची पेरणी केली गेली तर उत्पादनात अनुक्रमे २७ व ४० % घट येते, अशी माहिती कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. हरभऱ्याची उशिराने पेरणी केल्यास पिकाची वाढ कमी होते.
तसेच, फांद्या, फुले, घाटे कमी लागतात अन यामुळे उत्पादनात तब्बल 40 टक्क्यांपर्यंतची घट येते. यामुळे बागायती भागात 10 नोव्हेंबर पर्यंत हरभऱ्याची पेरणी पूर्ण करून घ्यावी असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे.