Harbhra Lagwad : येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात महाराष्ट्रासहित भारतात गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते. हरभरा पिका बाबत बोलायचं झालं तर हे रब्बी हंगामातील एक प्रमुख कडधान्य पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड केली जाते.
हरभऱ्याची लागवड ही 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होते. या पिकासाठी मध्यम ते भारी जमीन तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. अशा जमिनीत लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.
कोरडवाहू भागात जर हरभरा पेरणी करायची असेल तर ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर हरभऱ्याच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
अलीकडे हरभऱ्याला बाजारात चांगला भावही मिळत आहे. मात्र असे असले तरी या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्याच्या सुधारित जातींची पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान आज आपण अलीकडेच विकसित झालेल्या हरभऱ्याच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी हरभऱ्याचा एक नवीन वाण विकसित केला आहे.
सुपर जॅकी (एकेजी १४०२) असे या नवीन जातीचे नाव आहे. दरम्यान आज आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला हा नवीन वाण नेमका कसा आहे या जातीच्या विशेषता कोणकोणत्या आहेत याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हरभऱ्याच्या नवीन जातीच्या विशेषता
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमातून सुपर जॅकी (एकेजी १४०२) हा हरभऱ्याचा नवीन वाण विकसित केला आहे. हरभऱ्याचा हा वाण अधिक उत्पादन देणारा आहे.
ही जात हेक्टरी 20.73 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केलेला आहे. या जातीचे पीक 95 दिवसात परिपक्व होते आणि एकाच वेळी येणारा वाण म्हणून याला ओळख मिळालेली आहे.
या जातीपासून जाड जाण्याचा हरभरा मिळतो. या जातीचे पीक यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी योग्य आहे. ही जात मर रोगास देखील प्रतिकारक आहे. मर रोगास प्रतिकारक ते मध्यम प्रतिकारक असणारी ही जात करपा रोगास मध्यम प्रतिकारक असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.