Harbhara Lagwad : रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला होता यामुळे रब्बी हंगामातील या पिकांना या वाढलेल्या थंडीचा फायदा झाला. पण, या चालू आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळतं आहे.
महत्त्वाचे म्हणजे येत्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. याचा फटका हा रब्बी हंगामातील या पिकांना सुद्धा बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.
दरम्यान जर तुम्ही यंदा रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण हरभरा पिकावर येणाऱ्या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या औषधांची फवारणी केली पाहिजे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
घाटेअळीच नियंत्रण कसे करणार?
घाटेअळीच्या नियंत्रणासाठी शेतात एकरी वीस पक्षी थांबे आणि अळीचे प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यासाठी कामगंध सापळे बसवावेत असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. तसेच या आळीच्या रासायनिक पद्धतीने नियंत्रणासाठी काही फवारण्या सुचवण्यात आल्या आहेत. तसेच जैविक नियंत्रणासाठी देखील काही फवारण्या सुचवल्या गेल्या आहेत.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या अळीच्या जैविक नियंत्रणासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना ५% निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. जैविक फवारणी करून जर या अळीवर नियंत्रण मिळवता आले नाही तर शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणी करावी.
यासाठी अळी लहान असताना, म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. जर समजा अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात झालेला असेल तर इमामेक्टिन बेंझोएट ५% – ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा
क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% – ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा
फ्लुबेंडामाईड २०% – ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे.