Harbhara Lagwad : हरभरा हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची लागवड राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये केली जाते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी रब्बी हंगामा हरभऱ्याची लागवड करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची लागवड होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात यावर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात चांगला पाऊस झाला असल्याने यंदा हरभरा लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी तज्ञांनी दिला आहे.
ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान हरभरा लागवड होते आणि मार्च ते एप्रिल या दरम्यान या पिकाची हार्वेस्टिंग केली जाते. अर्थातच यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा लागवड येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे.
दरम्यान, आता आपण गेल्या रब्बी हंगामात उत्पादित झालेल्या हरभऱ्याला सध्या बाजारात काय भाव मिळत आहे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात काय दर मिळणार यासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सध्या काय दर मिळतोय
सन 2022 23 मध्ये जेवढे हरभरा उत्पादन झाले होते तेवढेच उत्पादन सन 2023 24 मध्ये होणार असा सुधारित अंदाज समोर आला आहे. सन 2023 24 या हंगामात 121.6 लाख टन एवढे हरभऱ्याचे उत्पादन होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, सध्या स्थितीला हरभरा बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास नमूद केले जात आहेत. पण, आगामी काळात हरभऱ्याचे दर कसे राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रातील सरकारने हरभऱ्याला 5440 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात हरभऱ्याला 6 हजार 500 ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळणे अपेक्षित आहे.
गेल्या तीन वर्षांचा विचार केला असता ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या काळात हरभऱ्याला ४,५६९ रुपये क्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या काळात ४,४५० रुपये क्विंटल आणि ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या काळात ५,७३६ रुपये क्विंटल यादरम्यान बाजार भाव मिळाला होता.
म्हणजेच गत तीन वर्षांपेक्षा यंदा हरभऱ्याला चांगला दर मिळणार अशी आशा आहे. यामुळे राज्यासहित संपूर्ण देशभरातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.