Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील देशभरातील नागरिकांसाठी आत्तापर्यंत अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेचा देखील समावेश होतो.
ही योजना नागरिकांना अपघात प्रसंगी मोठी उपयोगाची सिद्ध होते. ही एक विमा योजना आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली ही विमा योजना देशभरातील नागरिकांसाठी आहे. जर या विमा योजनेचा कोणी लाभ घेत असेल आणि अशा व्यक्तीचा जर अपघात झाला आणि अपघातात सदर व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आले तर या विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत पुरवली जाते.
विमाधारक व्यक्तीला अपघात झाल्यानंतर आर्थिक मदतीसाठी क्लेम करता येतो. या योजनेअंतर्गत सदर व्यक्तीला दोन लाखांपर्यंतची मदत मिळते. जर विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर विम्याची रक्कम ही त्याच्या नॉमिनीला मिळते. यामुळे अपघात प्रसंगी ही योजना सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी आहे.
विशेष म्हणजे या विमा योजनेत समाविष्ट होण्यासाठी फक्त वार्षिक वीस रुपयाचा प्रीमियम भरावा लागतो. म्हणजेच वीस रुपयात दोन लाखांपर्यंतचा विमा या योजनेअंतर्गत मिळतोय. दरम्यान आज आपण या योजने संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
- या विमा योजनेचा लाभ केवळ भारतीय नागरिकांना घेता येणार आहे.
- या योजनेतून अपघाती विमा केवळ 18 ते 70 वर्षे वयोगटातील नागरिकांना दिला जाणार आहे.
- विमा काढण्यासाठी सदर व्यक्तीचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे बचत खात्याला ऑटो डेबिटची सुविधा असणे देखील जरुरीचे आहे.
किती विमा मिळतो?
हा एक सरकारकडून दिला जाणारा अपघाती विमा आहे. या अपघाती विमाअंतर्गत विमा काढलेल्या व्यक्तीचा जर अपघातात मृत्यू झाला, व्यक्तीचे अपघातात डोळे निकामी झाले किंवा हात आणि पाय निकामी होऊन अपंगत्व आले तर सदर व्यक्तीला दोन लाख रुपयांची मदत दिली जाते.
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते. तसेच अपघातात जर विमाधारक व्यक्तीला एक हात किंवा पाय निकामी होऊन अपंगत्व आले किंवा एका डोळ्यातील दृष्टी कमी झाली तर 1 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते.
विमा कसा काढावा लागणार
जर विमा ऑफलाईन काढायचा असेल तर तुमचे जे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे तिथे जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा फॉर्म भरून तुम्ही विमा काढू शकता. किंवा https://www.jansuraksha.gov.in/ या वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. वीस रुपयाचा वार्षिक प्रीमियम हा फक्त एका वर्षासाठी राहणार आहे एक वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा वीस रुपयाचा प्रीमियम भरून ही योजना रिन्यू करावी लागते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा काढण्यासाठी आधार कार्ड लागते. ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतेही ओळखपत्र लागते. तसेच इनकम सर्टिफिकेट, बँक अकाऊंट डिटेल्स, वयाचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो यांसारखी महत्त्वाचे कागदपत्रे लागतात.