Government Scheme : आपला भारत शेतीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेती सोबतच अनेक शेतीशी निगडित व्यवसाय देखील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केले जात आहेत.
भारताच्या अर्थव्यवस्थेत देखील शेती क्षेत्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. यामुळे शेती क्षेत्राला उभारी मिळावी यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत.
मोदी सरकारने सुरू केलेल्या अशाच एका महत्त्वाच्या शेतकरी हिताच्या योजनेतुन 18 ते 40 वर्षे वयोगटातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 36 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान आज आपण मोदी सरकारच्या याच महत्वाकांक्षी योजने संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे योजना ?
मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. यासोबतच पीएम किसान मानधन योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी 36 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जात आहेत. मात्र यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना काही पैसे गुंतवावे लागतात. ही योजना शेतकऱ्यांसाठी कंपल्सरी नसून ऐच्छिक स्वरूपाची आहे.
जे शेतकरी यामध्ये सहभागी होतात त्यांना 55 ते 200 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागते. जे शेतकरी यामध्ये सहभागी होतात आणि नियमितपणे पैसे गुंतवतात त्यांना साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन मिळते.
या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना सहभाग घेता येतो. जर समजा शेतकऱ्यांनी 18 व्या वर्षी या योजनेत सहभाग घेतला तर त्यांना 60 वर्षापर्यंत या योजनेत पैसे गुंतवावे लागतात.
मग साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या सदर शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळते. या योजनेसाठी दोन हेक्टर पेक्षा कमी जमिन असणारे शेतकरी पात्र ठरतात.
किती पैसे गुंतवावे लागतात?
जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला दरमहा 55 रुपये गुंतवावे लागणार आहेत. तसेच जर तुम्ही 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला दरमहा दोनशे रुपये गुंतवावे लागणार आहेत.
म्हणजे केंद्रातील सरकारने सुरू केलेली ही शेतकऱ्यांसाठी ची एक पेन्शन योजना आहे. या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना मिळतो. इतर सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही.