Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो. महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी महिलांना केंद्रस्थानी ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे थेट महाडीबीटीच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहेत.
यामुळे या योजनेतील पारदर्शकता वाढलेली आहे आणि महिलांना लवकर लाभ मिळतोय. दरम्यान आता शासनाच्या याच महत्वकांक्षी योजनेच्या धर्तीवर इतरही काही योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची एक नवीन योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे.
खरे तर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या आधीपासून विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या काही योजना आहेत. पण, या योजनांचे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यास विलंब होतो. यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून या योजनेचे पैसे वेळेवर मिळत नाहीत यामुळे या पैशांचा फारसा लाभ होत नाही असा ओरड केला जात होता.
सर्वसामान्य नागरिकांची हीच भावना आणि समस्या लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, आता राज्यात सुरु असणाऱ्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे महाडीबीटीमधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले आहेत.
सध्या मंत्रालयातून विभागीय आयुक्त मग जिल्हाधिकारी आणि तिथून तहसील कार्यालयात या योजनेचे पैसे येतात. त्यानंतर, लाभार्थ्यांना पैसे मिळतात. या प्रक्रीयेसाठी बरेच दिवस लागतात. मात्र, आता नवीन निर्णयामुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
राज्यात विशेष अर्थ सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या अनेक कौतुकास्पद योजना सुरू आहेत. या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थ सहाय्य केले जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या लाडकी बहीण योजनेप्रमाणेच पंधराशे रुपये प्रति महिना या दराने लाभ दिला जातोय.
पण, सध्याच्या प्रक्रीयेनुसार लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचण्यास बराच वेळ जातो आणि लाभार्थ्यांना वाट बघावी लागते. यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
पण, आता संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या योजनेचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. म्हणजेच शासनाच्या माध्यमातून हा पैसा थेट लाभार्थ्याच्या खात्यात येणार आहे. यामुळे मधली जी प्रक्रिया होती ती सर्व प्रक्रिया आता रद्द होईल आणि कमी वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा येईल.