Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध योजना केंद्र शासनाकडून राबवल्या जातात.
2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील देशातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काही महत्त्वाच्या आणि अतिशय कौतुकास्पद अशा योजनांची सुरुवात केली आहे.
मोदी सरकारने देशातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अशा काही योजना सुरू केल्या आहेत ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक लाभ पुरवला जात आहे. आज आपण केंद्र शासनाने सुरू केलेल्या 3 महत्त्वाच्या योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
पीएम किसान सन्मान निधी योजना : ही योजना देशभरातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात सन 2019 मध्ये झाली आहे. ही मोदी सरकारची एक महत्वाची योजना आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेचा लाभ दिला जातो. दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांना एक हप्ता मिळतो. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा पंधरावा हप्ता हा या चालू ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात दिला जाणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना : देशभरातील छोट्या-मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील स्टार्टअप्सला कर्ज पुरवले जात आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात शिशु वर्गातून पन्नास हजार रुपये, किशोर वर्गातून पन्नास हजार ते पाच लाख रुपये आणि युवा वर्गातून पाच लाख ते दहा लाख रुपये एवढे कर्ज पुरवले जाते.
अटल पेन्शन योजना : या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पेन्शनचा लाभ दिला जात आहे. यासाठी सर्वप्रथम नागरिकांना या योजनेत नोंदणी करावी लागते आणि सुरुवातीला प्रीमियम भरावा लागतो. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक समाविष्ट होऊ शकतात आणि गुंतवणूक करू शकतात.
एका ठराविक कालावधीपर्यंत या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आणि निवृत्तीचे वय झाल्यावर या योजनेअंतर्गत लोकांना 1000, 2000, 3000 किंवा 5000 रुपये एवढी पेन्शन दिली जाते.