Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने शेकडो योजना सुरू केल्या आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसान मानधन योजना या अशाच दोन लोकप्रिय योजना आहेत.
या योजनेतील पीएम किसान मानधन योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक ऐच्छिक योजना आहे. या योजनेला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. या अंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये दिले जातात. यामुळे आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसे आहे योजनेचे स्वरूप?
ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उतार वयात पेन्शन मिळायला हवी या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही एक पेन्शन योजना असून यामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी सहभागी होऊ शकतात. पण याचा लाभ हा प्रत्येकचं शेतकऱ्याला मिळत नाही.
जर याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हावे लागते आणि प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम यामध्ये गुंतवावी लागते. या योजनेत देशभरातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी पात्र ठरतात. अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
जर समजा एखाद्या शेतकऱ्याने अठराव्या वर्षी या योजनेत सहभाग घेतला तर त्याला 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला 55 रुपये गुंतवावे लागतात. जर एखाद्या शेतकऱ्याने 40 व्या वर्षी या योजनेत सहभाग घेतला तर त्याला त्याची वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये गुंतवावे लागतात.
म्हणजेच ही एक ऐच्छिक आणि योगदानात्मक निवृत्ती वेतन योजना आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आणि वयाची साठ वर्षे होईपर्यंत यामध्ये पैसे गुंतवत राहिलेत तर त्यांना 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये मिळतात. म्हणजेच 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा लाभार्थी शेतकऱ्याला एका वर्षात 36 हजार रुपयांची पेन्शन मिळते.
योजनेच्या लाभासाठी कोणते शेतकरी पात्र ठरतात?
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट 2019 च्या नोंदीप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीमध्ये सूचीबद्ध असलेले सर्व शेतकरी या योजनेअंतर्गत लाभांसाठी पात्र आहेत. मात्र याचा लाभ हा सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाही.
जे शेतकरी यामध्ये नोंदणी करतात आणि प्रीमियम भरतात त्यांनाचं याचा लाभ मिळतो. या योजनेचा आतापर्यंत 23 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. बिहार आणि झारखंड हे दोन राज्य या योजनेच्या लाभामध्ये अग्रेसर आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत.
अर्ज कुठं करायचा?
जर तुम्हाला या योजनेत नाव नोंदणी करायचे असेल सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) भेट द्यावी किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारांनी नियुक्त केलेल्या नोडल अधिका-याशी (पीएम-किसान) संपर्क साधु शकता. तसेच www.pmkmy.gov.in या योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलला भेट देऊन यासाठी नोंदणी पूर्ण करू शकता.