Tractor News : गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्रात ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदीच पूर्व मशागतीपासून ते पिकाची काढणी करेपर्यंत आणि शेतमाल वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर होतोय. ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. यामुळे छोटे-मोठे शेतकरी आता ट्रॅक्टरचा वापर करताना दिसतायेत.
मात्र, ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांकडे मात्र ट्रॅक्टर खरेदीसाठी संपूर्ण पैसा उपलब्ध नसतो. यामुळे काही शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतात. शेतकऱ्यांकडून हप्त्यावर ट्रॅक्टर खरेदी करण्याला पसंती दाखवली जाते. महत्त्वाचे म्हणजे फक्त नवीनच ट्रॅक्टर हप्त्याने मिळतो असे नाही तर जुना ट्रॅक्टर देखील हप्त्याने घेता येतो.
परंतु हप्त्याने ट्रॅक्टर घेताना शेतकऱ्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. हप्त्याने ट्रॅक्टर घेताना जर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केले नाही तर त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आज आपण हप्त्याने ट्रॅक्टर घेताना शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सरकारी अनुदानाचा शोध घ्या
ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. यामुळे ट्रॅक्टर घेताना तुम्ही शासनाच्या अनुदानाची माहिती घेतली पाहिजे. शासनाच्या योजनेतून तुम्हाला अनुदान दिले जाते अन या अनुदानाचा लाभ घेतल्यास तुम्हाला ट्रॅक्टर कमी किमतीत मिळते.
हफ्ते जास्त ठेऊ नयेत
शेतकऱ्यांनी जर हप्त्यावर ट्रॅक्टर घ्यायचे ठरवले असेल तर त्यांनी जास्त रकमेचे कमी हप्ते ठेवावेत. जास्त हप्ते राहिले तर व्याज जास्त लागतं आणि कमी हप्ते राहिले तर हफ्त्याची रक्कम वाढते मात्र व्याज कमी लागते.
जर कमी रकमेचे हफ्ते ठेवलेत तर कर्जाचा कालावधी वाढतो आणि यामुळे व्याज जास्त भरावे लागते. कमी रकमेचा हप्ता भरतांना शेतकऱ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही मात्र कर्ज कालावधी आणि व्याज वाढत जाते यामुळे नेहमीच मोठ्या रकमेचा हप्ता ठेवावा. यामुळे व्याज कमी लागते आणि शेतकऱ्यांचा पैसा वाचतो.
डाऊन पेमेंट जास्त करा
हफ्त्यावर ट्रॅक्टर घेताना डाऊन पेमेंट नेहमी जास्त केले पाहिजे. डाऊन पेमेंट जास्त केले तर हप्ता कमीचा बसतो आणि कमी कालावधीत कर्ज नील होऊ शकते. डाऊन पेमेंट जास्त केल्यामुळे कर्जाची रक्कम कमी होते आणि यामुळे व्याज कमी लागते. अशी रक्कम लवकरात लवकर फेडता येते.
तुमच्याकडे पैसे आल्यास संपूर्ण रक्कम भरून टाका
हप्त्यावर ट्रॅक्टर घेतले आणि नंतरच्या काळात तुमच्याकडे उत्पन्नातून चांगले पैसे शिल्लक राहिले तर तुम्ही ट्रॅक्टर साठी घेतलेले संपूर्ण कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा. ट्रॅक्टरच्या कर्जाची रक्कम एकाच वेळी भरल्यास तुमच्या व्याजात मोठी बचत होते.