Gold Snatching Vima Policy : भारतात सोन्याला मोठी मागणी असते. आपल्याकडे सणासुदीच्या दिवसात तसेच लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. महिला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घेतात. पुरुष देखील चेन, ब्रेसलेट, अंगठी यांसारखे दागिने घालतात. अलीकडे मात्र भारतात सोन्याच्या किमती खूपच विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.
विशेष म्हणजे आगामी काळात सोने आणखी मागणार आहे. यामुळे अनेक जण गुंतवणुकीसाठी देखील सोन्याची खरेदी करत असतात. पण, सध्या या मौल्यवान धातूची चोरी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. सोन्याची चोरी झाल्यास सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत असतो.
सोने खरेदी करण्यासाठी लागणारी संपूर्ण रक्कम वाया जात असते. मात्र, जर तुम्ही कल्याण ज्वेलर्स, सेन्को गोल्ड अँड डायमंड, मलबार गोल्ड यांसारख्या मोठ्या ज्वेलर्सकडून सोने खरेदी केले असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला सोन्याच्या चोरीमुळे होणाऱ्यां नुकसानीची भरपाई मिळवता येणार आहे.
तुमचे सोने चोरीला गेले तर तुम्हाला सोन्याचे पैसे परत मिळू शकणार आहेत. कारण की या मोठ-मोठ्या ज्वेलर्स कडून तुम्हाला सोने खरेदी केल्यावर मोफत विमा दिला जात आहे.
यामुळे जर तुमचे सोने चोरीला गेले तर तुम्हाला सदर विमा कंपनीकडून सोन्याचे पैसे परत मिळू शकणार आहेत. यामुळे सोने चोरीला गेल्यास तुमचे होणारे मोठे नुकसान टळणार आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचा विमा देखील सामान्य विम्यासारखाच आहे. आपण आपल्या मालमत्तेचा आणि जीवनाचा विमा घेतो, तसाच तो सोन्याचा किंवा इतर दागिन्यांसाठीही घेऊ शकतो.
अलीकडे सोन्याची विमा योजना विशेष लोकप्रिय होत असून याच पार्श्वभूमीवर आता देशातील अनेक मोठ्या ज्वेलर्ससोबतच अनेक छोट्या ज्वेलर्सनीही सोन्याचा विमा देऊ करण्यास सुरवात केली आहे.
विमा दावा केव्हा करता येतो
जर तुम्ही सोन्याचा विमा काढलेला असेल तर नैसर्गिक आपत्ती, दंगल, संप, स्नॅचिंग, दरोडा किंवा घरफोडी यांसारख्या घटनांमुळे सोन्याचे नुकसान झाल्यास विमा रक्कम दिली जात असते.
अपघात, दहशतवाद आणि ट्रांझिट दरम्यान होणारे नुकसान देखील यात कव्हर करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. दागिन्यांच्या एकूण किमतीच्या 95 टक्के एवढी रक्कम तुम्हाला मिळू शकते.
दरम्यान जर तुम्ही सोन्याचा विमा काढलेला असेल आणि तुमचे सोने चोरीला गेले असेल तर तुम्हाला विम्यासाठी दावा करताना पोलिस अहवाल, कोणतेही सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी आणि दागिने हरवण्याच्या कारणांचा तपशील देण्याच्या क्लेम फॉर्मसह इतर सहाय्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.