Goat Rearing : भारतात फार पूर्वीपासून पशुपालनाचा व्यवसाय केला जातोय. अनेक जण शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसाय करतात. अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी ग्रामीण भागात शेळीपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेळीपालन हे मांस आणि दूध उत्पादनासाठी केले जाते. मात्र शेळीपालनाच्या व्यवसायातून जर चांगली कमाई करायची असेल तर याच्या सुधारित जातींचे पालन करणे आवश्यक असते.
दरम्यान, आज आपण शेळीच्या अशा दोन विदेशी जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की दूध उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जातात. या जाती म्हैस जेवढे दूध देते तेवढे दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.
यामुळे नक्कीच या जातीचे पालन करून शेतकऱ्यांना चांगले दूध उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया शेळीच्या या दोन सुधारित जाती कोणत्या आहेत आणि त्यांच्या विशेषता नेमक्या काय आहेत.
या आहेत शेळीच्या सुधारित जाती
आम्ही ज्या शेळीच्या जातीबाबत बोलत आहोत त्या आहेत छगली आणि सानन. या विदेशी जातीच्या शेळ्या आहेत. या शेळीच्या जाती म्हैस जेवढे दूध देते तेवढे दूध देण्यास सक्षम असतात. या विदेशी जातींच्या शेळीचे दूध अत्यंत पौष्टिक असते.
यामुळे बाजारात याला नेहमीच मोठी मागणी असते. शिवाय या शेळीच्या दुधाला बाजारात सामान्य शेळीच्या तुलनेत अधिक भाव मिळतो. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे या जातीच्या शेळीचे दूध बाजारात जवळपास 100 ते 150 रुपये प्रतिलिटर या दराने विकले जाते.
विशेष म्हणजे या जातीच्या शेळीचे मांसही खूप महाग असते. या जातीच्या शेळीचे मांस हजारो रुपये किलोने विकले जाते. परदेशी बाजारात या जातीच्या शेळीच्या मांसाची किंमत 1000 रुपये प्रति किलो पर्यंत असते. या शेळीचे वजन हे साधारणता 60 ते 80 किलो एवढे असते.
या शेळीचे तोंड लहान असते, परंतु ही शेळी मागील बाजूस जाड असते. जर तुम्हीही शेळीपालन करत असाल तर या शेळीचे पालनपोषण करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
ही शेळी तुम्हाला कमी कालावधीतच चांगले पैसे कमवून देणार आहे. ही शेळी पांढरी आणि काळ्या या दोन रंगात उपलब्ध असते. या जातीच्या शेळीची शिंगे मोठी असतात.
हिचे कान पाठीमागे असतात. या शेळीला केक म्हणजे ढेप आणि हिरवा चारा खायला आवडतो. या शेळीची लांबी 3.30 फूट आणि रुंदी 4 ते 4.15 फूट इतकी असते.
या शेळीला कळपात राहणे सर्वात जास्त आवडते. शेळीची ही जात दूध आणि मांस अशा दुहेरी उद्देशाने पाळली जाते. यामुळे जर तुम्हीही शेळी पालन करत असाल तर नक्कीच या जातीचे पालन करून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवता येणार आहे.