Goat Rearing : भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखल जात, कारण म्हणजे आपला देश हा शेती क्षेत्रावर अवलंबून आहे, देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर तसेच शेतीशी निगडित व्यवसायांवर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत देखील शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारतात शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो, पशुपालन करणारे अनेक शेतकरी शेळी पालन करतात. कमी खर्चात सुरू होणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो खरा, पण शेळी पालन व्यवसाय करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
तज्ञ सांगतात की शेतकऱ्यांनी शेळ्यांच्या अशा जातींचे पालन करायला पाहिजे ज्या की राज्याच्या हवामानात तग धरून राहतील. शेळीपालन हे प्रामुख्याने दुग्ध आणि मांस उत्पादनासाठी होते. दरम्यान, जर तुम्हीही शेळी पालन करत असाल किंवा शेळीपालन करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील हवामानात चांगले दुग्ध अन मांस उत्पादन देणाऱ्या शेळ्यांच्या काही प्रमुख जातींची माहिती सांगणार आहोत.
शेळीच्या प्रमुख जाती
उस्मानाबादी शेळी : तज्ञ सांगतात की, उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आढळते. दुग्ध आणि मांस उत्पादनासाठी या जातीचे संगोपन केले जाऊ शकते. पण, शेतकरी प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी या जातीची निवड करतात. तुम्ही शेळीपालन करणार असाल तर या जातीपासून नक्कीच चांगलें उत्पन्न मिळवू शकतात. ही शेळी प्रामुख्याने काळ्या रंगाची असते, कान लोंबकळणारे असतात, शिंगे मागे वळलेली असतात.
या जातीच्या शेळीची उंची ६५ ते ७० सेंटीमीटर एवढी असते. लांबी साधारणतः ६० ते ६५ सें.मी. असते. या जातीच्या शेळीच्या करड्याचे वजन अडीच किलोपर्यंत भरते. पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन साधारणतः ३० ते ३५ किलो भरते अन पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन जवळपास ४५ ते ५० किलो असते.
ही शेळी सात ते आठ महिन्यात वयात येते अन 8 ते 9 महिन्यात पहिल्यांदा गाभण राहते. 13 ते 14 महिन्यात या जातीची शेळी प्रथम विण्यास येते. दोन वितामधील अंतर हे फक्त आठ ते नऊ महिने असते. नक्कीच जर शेळीपालन करायच असेल तर या जातीची शेळी फायद्याची ठरणार आहे. धाराशिव व आजूबाजूच्या जिल्ह्यात या जातीच्या शेळ्या मोठ्या प्रमाणात आढळतात.
संगमनेरी : तुम्हाला मांस उत्पादनासाठी शेळी पालन करायचे असेल तर संगमनेरी जातीची शेळी तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. तज्ञ सांगतात की संगमनेरी शेळी पांढरा, पांढरट तांबडा आणि तांबड्या रंगाची असते. या जातीच्या 66% शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात आणि 16% शेळ्या तांबड्या रंगाच्या असतात अन उर्वरित 18% शेळ्या या पांढरट तांबडा रंगाच्या असतात. या जातीच्या जवळपास आठ ते बारा टक्के शेळ्या बिना शिंगाच्या म्हणजेच भुंड्या असतात, म्हणजे या जातीच्या बहुतांशी शेळयांमध्ये शिंगे आढळतात.
शिंगाचा आकार हा सरळ, मागे वळलेले असा असतो. या जातीच्या शेळ्यांचे कान प्रामुख्याने लोंबकळणारे परंतु काही शेळयामध्ये उभे किंवा समांतर आढळतात. या जातीच्या शेळ्यांचे कपाळ हे प्रामुख्याने बर्हिवक्र आणि सपाट. संगमनेरी शेळयांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते. या जातीच्या 42 टक्के शेळ्यांमध्ये स्तनाचा आकार गोलाकार असतो, 25% शेळ्यांमध्ये वाडग्यासारखा आणि 22 टक्के शेळ्यांमध्ये लोंबकळणारे स्तन आढळतात. शेळीची संगमनेरी जात साधारणता आठ महिने पूर्ण झाल्यानंतर वयात येते.
आठ ते नऊ महिने झालेत की प्रथम माजावर येते. साधारणता नऊ महिने 15 दिवस उलटल्यानंतर या जातीची शेळी गाभण राहते. प्रथम विण्याचे वय हे 14 ते 15 महिने या दरम्यान असते. या जातीच्या शेळ्या जुळे अन तिळे पिल्लं जन्माला घालू शकतात. पण तिळे पिल्लं जन्माला घालण्याचे प्रमाण हे फारच कमी आहे. जुळ्यांचे प्रमाण हे जवळपास 54.23% आणि तीळ्यांचे प्रमाण अवघे 2.81% इतकं असतं. या जातीच्या शेळीचे संगोपन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी होते मात्र 90 दिवसाच्या काळात या जातीच्या शेळी 80 लिटर दूध देण्याची क्षमता ठेवतात.
सुरती शेळी : या जातीच्या शेळीला खानदेशी तसेच निवाणी असं सुद्धा नाव मिळालंय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही जात तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या जवळील गुजरात राज्यातही या जातीच्या शेळ्यांचे मोठ्या प्रमाणात संगोपन होते. ही शेळी संगमनेरी आणि उस्मानाबादी या दोन्ही जातींच्या शेळ्यांच्या तुलनेत दुग्ध उत्पादनात अधिक सरस आहे. यामुळे या जातीचे संगोपन हे दुहेरी उद्देशाने केले जाते. दुग्धउत्पादनाबरोबरच मांस उत्पादनासाठी देखील या जातीच्या शेळीचे संगोपन होते.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीची शेळी गुजरात राज्यातील सुरत व आजूबाजूच्या परिसरात तसेच महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विभागात म्हणजेच खानदेश विभागात या जातीच्या शेळीचे संगोपन होते. खानदेशातील धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये या जातीच्या शेळ्या मोठ्या प्रमाणात आपल्या नजरेस पडतात. या जातीची शेळी ही पांढऱ्या रंगाची असते. कान लांबट अन रुंद असतात. या जातीच्या शेळीची कास चांगली मोठी असते. या जातीची शेळी दररोज एक ते दिड लिटर आणि एका विताच्या हंगामात एकूण १२० ते १५० लिटर इतकं दुध देऊ शकते.