Goat Rearing : भारतात फार पूर्वीपासून शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातोय. यामध्ये शेळी पालन, गाय पालन, म्हैस पालन, वराह पालन अशा विविध जनावरांचे संगोपन केले जाते. यातील शेळी पालन हा व्यवसाय सर्वाधिक केला जातो. शेळीला गरिबांची गाय म्हणून ओळखतात.
याचे पालन ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर लोक मोठ्या प्रमाणात करतात. शेळीपालनाचा व्यवसाय हा दूध आणि मांस अशा दुहेरी उद्देशाने केला जातो. शेळीपालनाच्या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे.
पण, शेळीपालनातून जर चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर शेळीच्या सुधारित जातींचे संगोपन करणे आवश्यक आहे. यामुळे आज आपण शेळीच्या काही प्रगत जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण ज्या शेळींची माहिती पाहणार आहोत त्या शेळ्या दूध उत्पादनासाठी पाळल्या जातात हे विशेष. या शेळ्या देशी गायीपेक्षा अधिक दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे.
शेळीच्या सुधारित जाती कोणत्या ?
टोगेनबर्ग : ही शेळीची एक प्रगत जात आहे. ही शेळीची विदेशी जात आहे. ही स्वित्झर्लंडची शेळी आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यांना शिंगे नसतात. ही शेळी देशी गाईप्रमाणे दूध देण्यास सक्षम आहे.
ही शेळी दररोज सरासरी 3 किलो दूध देऊ शकते असा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीच्या शेळ्यांची मान लांब व पातळ असते. त्याचे कान ताठ असतात. या शेळ्या तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या असू शकतात. या जातीच्या बोकडाचे वजन 70 ते 80 किलो आणि शेळ्यांचे वजन 50 ते 60 किलो असते.
सानेन : शेळीची ही एक विदेशी जात आहे. ही स्वित्झर्लंडची शेळी आहे. ही जात दूध उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते. या जातीची दूध उत्पादन क्षमता इतर जातींपेक्षा अधिक आहे. ही शेळी दररोज सरासरी 3 ते 4 किलो दूध देण्यास सक्षम आहे.
जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये ही शेळी पाळली जात आहे. या शेळीचे वजन किमान 85 किलो इतके आहे. या शेळ्या प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या असतात. या जातीच्या शेळीचे कान सरळ असतात. या जातीच्या काही शेळ्यांना शिंग नसतात हे विशेष.
अँग्लोनुव्हियन : शेळीची ही देखील एक विदेशी जात आहे. परदेशी जातीची अँग्लोनुव्हियन शेळी प्रामुख्याने युरोपात पाळली जाते. युरोपातील अनेक देशांमध्ये ही शेळी तुम्हाला सहजतेने आढळून येणार आहे. ही शेळी मांस आणि दूध अशा दुहेरी उद्देशाने पाळली जात आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शेळी दररोज 2 ते 3 किलो दूध देण्यास सक्षम आहे. या शेळीचे पाय लांब असतात. याची शिंगे लहान आणि खाली वळलेली असू शकतात. या शेळीचे कान हे थोडेसे लांब असतात.