Goat Rearing : शेळीपालन हा व्यवसाय आपल्या भारतात फार पूर्वीपासून केला जातोय. शेतीपूरक व्यवसाय असल्याने या व्यवसायातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. शेळीला आपल्याकडे गरीबाची गाय म्हणून संबोधतात. याचे कारण म्हणजे शेळीपालनासाठी खूपच कमी खर्च येतो. यामुळे ग्रामीण भागात शेतकरी असो किंवा शेतमजूर अनेकजण शेळीपालनाचा व्यवसाय करतात.
शेळीपालन व्यवसायासाठी खूपच कमी जागेची आवश्यकता भासत असते. शिवाय शेळीला खूपच कमी चारा आणि पशुखाद्याची गरज असते. अशा परिस्थितीत शेळीपालनाचा हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.
शेळीपालन व्यवसाय हा शेतीसोबतच ग्रामीण भागाचा अर्थव्यवस्थेचा खऱ्या अर्थाने एक कणा बनला आहे. मात्र असे असले तरी शेळीपालन व्यवसायातून जर चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर शेळीच्या चांगल्या जातींचे संगोपन करणे गरजेचे ठरते.
शेळीपालन हा व्यवसाय प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केला जातो. याशिवाय दुग्धोत्पादनासाठी देखील हा व्यवसाय केला जातो. तसेच लोकर, लेंडी खत इत्यादी उत्पादने देखील या व्यवसायातून प्राप्त होत असतात. यामुळे शेळीपालनाचा हा व्यवसाय बहुउद्देशीय ठरतो.
दरम्यान आज आपण शेळीच्या अशा काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की दुग्धोत्पादनासाठी खूपच फायदेशीर आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
दुग्धोत्पादनासाठी उत्कृष्ट शेळीच्या जाती कोणत्या
जमुनापुरी शेळी : जमुनापुरी ही एक शेळीची उत्कृष्ट जात आहे. या जातीच्या शेळ्या दुग्ध उत्पादनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. शेळीच्या दुधात असणारे औषधी गुणधर्म पाहता बाजारात नेहमीच शेळीच्या दुधाला चांगला भाव मिळतो.
यामुळे अनेक जण या जातीच्या शेळ्या दुग्ध उत्पादनासाठी पाळत आहेत. ही भारतातील सर्वाधिक उंचीची शेळीची जात म्हणून ओळखली जाते. शेळीची ही जात एकावतात 201 लिटर पर्यंतचे दूध देते. यामुळे या जातीचे संगोपन मांस आणि दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे.
संगमनेरी शेळी : या जातीचे आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. या जातीची शेळी देखील दुग्धोत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र या जातीचे दुग्धोत्पादन जमुनापुरी शेळी पेक्षा थोडेसे कमी आहे.
या जातीची शेळी एका वेतात 80 लिटर पर्यंतचे दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. या जातीच्या शेळीला महाराष्ट्रातील दुधाची राणी म्हणून ओळख मिळालेली आहे. ही शेळी देखील मांस आणि दुग्ध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाळली जाते.
सानेन शेळी : जमुनापुरी आणि सानेन शेळी दुग्ध उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जातात. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर योग्य पद्धतीने काळजी घेतली गेली तर सानेन शेळी एका वेतात 201 लिटर पर्यंतचे दूध देऊ शकते. शेळीची ही जात अधिक दूध देत असल्याने या जातीचे देखील मोठ्या प्रमाणात संगोपन होते. भारतातील अनेक राज्यात या जातीच्या शेळीचे संगोपन होत आहे.