Gharkul Yojana : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यात की, लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, काल विधिमंडळात राज्याचा अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, इत्यादींसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्यात.
यामध्ये नवीन घरकुल योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. खरंतर राज्यात महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घरकुल योजना राबवल्या जात आहेत.
यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना अशा कल्याणकारी योजनांचा समावेश होतो.
एवढेच नाही तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने जाहीर केलेल्या नमो आवास योजनेचा देखील यामध्ये समावेश होतो. नमो आवास योजनेअंतर्गत राज्यातील ओबीसी समाजातील नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे.
याशिवाय, केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देखील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यांना राहण्यासाठी हक्काचे घर नाही अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत घर उपलब्ध होत आहे.
दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका घरकुल योजनेची घोषणा करण्यात आली. अजित पवार यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन घरकुल योजनेची घोषणा केली आहे.
ज्या दिव्यांग बांधवांना हक्काचे घर नाही अशा दिव्यांग व्यक्तींना घरकुल उपलब्ध करून दिले जाईल असे शासनाने काल जाहीर केले आहे.
या घोषणेमुळे राज्यातील बेघर असलेल्या दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान या योजनेचा 34 हजार 400 लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून दिला जाईल असे यावेळी वित्तमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे.