Fish Farming : भारतात शेती समवेतच पशुपालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जातोय. पशुपालन व्यवसायात गाय, म्हैस, वराह, शेळी, मेंढी इत्यादी जनावरांचे संगोपन केले जाते. याशिवाय, कुक्कुटपालन आणि मासे पालन देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
मासे पालन हा व्यवसाय तर अलीकडे मोठ्या प्रमाणात विस्तारला असून या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मासे पालन व्यवसायामध्ये आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे.
दरम्यान, आज आपण भारतात मांगुर माशाचे पालन करण्यास का बंदी आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अनेकांना भारतात मांगुर माशांचे पालन करण्यास बंदी हे माहिती असेल. मात्र मांगुर माशांचे पालन करण्यास भारतात बंदी कां आहे ? यामागील कारण नेमके काय आहे याची माहिती नसणार.
दरम्यान आज आपण केंद्र शासन आणि भारतात मांगुर माशांचे पालन करण्यास का बंदी घातली आहे ? याच संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
का पाळला जात नाही मांगूर मासा ?
मांगूर मासा हा लांब मिशा असलेला मासा आहे. याच्या मिशा लांब असतात, हेच कारण आहे की याला कॅट फिश मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र हा मासा आता भारतात पाळला जाऊ शकत नाही.
1997 पासून या माशाचे पालन करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. खरेतर या माशाचे सेवन केल्यास मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. हा मासा मानवी आरोग्यासाठी खूपच घातक आहे.
हा थाई मांगुर मासा जलीय परिसंस्थामधील तर घटकांसाठी देखील हानिकारक आहे. हा मासा इतर माशांच्या प्रजाती लुप्त होण्यासाठी कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. हा मासा अनेकदा अजैविक कचऱ्याचे सेवन करत असल्याचे आढळून आले आहे.
या माशाच्या मांसात झिंक, कॅडमियम आणि आरसेनिक सारख्या जड धातूंचे संक्रमण आढळून आले आहे. हे धातू मानवी शरीरासाठी खूपच हानिकारक आहेत.
हेच कारण आहे की 1997 मध्ये या माशांवर बंदी घालण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्रालयाच्या मासेमारी विभागातर्फे थाई मांगुर या माशावर बंदी घातली गेली आहे.