Fertilizer Rate 2025 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नैसर्गिक संकटांनी आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
खरे तर खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे खरीप हंगामातील हे नुकसान कसे भरून काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत.
असे असतानाच आता रासायनिक खतांच्या किमती वाढवण्याचा निर्णय खत उत्पादक कंपन्यांनी घेतला आहे. या वाढीव किमती 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार असून आज आपण कोणत्या खतांच्या किमती किती रुपयांनी वाढल्या आहेत याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढल्यात किंमती?
रासायनिक खतांच्या किमती 200 ते 300 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. या दरवाढीमुळे शेतकरी मात्र नाराज झाले असून सरकार विरोधात संतापाची भावना व्यक्त होत आहे.
रासायनिक खतांच्या किमती आता तीनशे रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. वाढीव दरानुसार डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रतिपिशवी १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपयांवर पोहचली आहे.
टीएसपी ४६ टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खत १३०० ऐवजी १३५० रुपयांना मिळणार आहे, म्हणजे या खताची किंमत पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १४७० रुपयांवरून १७२५ रुपये होणार आहे, म्हणजेच या खतांच्या किमती 255 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.
या सर्व खतांच्या वाढलेल्या किमती एक जानेवारीपासून लागू राहतील. म्हणून शेतकऱ्यांचा आर्थिक भार आणखी वाढणार आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले असून आता पुन्हा एकदा खताच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.