Farming Success Story : अनेक दशकांपासून शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता नवयुवक तरुण शेतीपासून (Agriculture) दुरावत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता प्रयोगशील शेतकरी बांधव (Progressive Farmer) देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करावी किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहत आहेत.
मात्र जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीदेखील नोकरी पेक्षा कमी नाही. विशेष म्हणजे काही तरुणांना ही बाब चांगलीच उमगली आहे. हेच कारण आहे की एक वर्ग जरी शेती पासून दुरावत असला तरी आजही आपल्या देशात असा एक वर्ग आहे जो नोकरीऐवजी शेतीला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एका प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने (Successful Farmer) आपल्या दीड एकर शेतात आधुनिक पद्धतीने शेती करत तब्बल 18 लाख रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.
त्यामुळे सध्या हा अवलिया शेतकरी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मौजे हंगेवाडी येथील नवनाथ दिगंबर विधाते असे या तरुण शेतकऱ्याचे नाव. या तरुण शेतकऱ्याने शेतीमध्ये (Farming) आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करत पीक पद्धतीत बदल केला आहे. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने नवनाथ दादांनी पीकपद्धतीत बदल करत डाळिंब या फळबाग पिकाची (Pomegranate Crop) लागवड केली आहे.
डाळिंब लागवड (Pomegranate Farming) केल्यानंतर योग्य नियोजन आणि योग्य पीक व्यवस्थापन करून त्यांनी डाळिंब शेतीतुन लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे. या तरुण शेतकऱ्याने दीड एकरात लावलेल्या डाळिंब पिकातून सात महिन्यात 30 टन एवढे उत्पादन घेऊन दाखवले आहे. या 30 टन डाळिंब उत्पादनातून त्यांना 18 लाखांची कमाई झाली आहे. विधाते यांनी उत्पादित केलेला डाळिंब थेट कलकत्त्याच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे.
कोलकाता येथील व्यापारी यांचा डाळिंब माल घेऊन जात आहेत. त्यांच्या डाळिंबाला 70 ते 100 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. मित्रांनो विधाते यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात जवळपास सातशे डाळिंबाच्या रोपांची लागवड केली आहे. आतापर्यंत नवनाथ यांना डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला आहे. त्यांचा परिवार देखील त्यांना शेतीमध्ये मदत करत असल्याने उत्पादन खर्च कमी आला असल्याचे नवनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
नवनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना एका डाळिंब झाडापासून त्यांना 45 किलो पर्यंत डाळिंबाचे उत्पादन मिळत आहे. निश्चितच अवघ्या दीड एकरात या तरुण शेतकऱ्याने अठरा लाखांची कमाई केली असल्याने इतर शेतकऱ्यांना यामधून प्रेरणा मिळणार आहे. शिवाय जे शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत त्यांच्यासाठी आरसा दाखवण्याचे काम नवनाथ यांनी केले आहे.