Farmer Success Story : आपल्या राज्यातील जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीशी राज्यातील बहुतांशी नागरिकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. शेतीसोबतच शेळीपालन हा व्यवसाय देखील आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे.
शेळीला गरीबाची गाय म्हणूनही ओळखले जाते. मात्र ही गरीबाची गाय शेतकऱ्यांना लाखो रुपये कमवून देऊ शकते. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र सांगली जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखवले आहे. सांगलीच्या एका दहावीपर्यंतच्या शिक्षण घेतलेल्या तरुणाने शेळीपालन व्यवसायातून वर्षाला तब्बल 60 लाखांपर्यंतची कमाई करून दाखवली आहे.
त्यामुळे सध्या या तरुणाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील मौजे बामणी येथील तेजस लेंगरे यांनी ही किमया साधली आहे. तेजस यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी 1999 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. दहावीनंतर त्यांना शिकायचे होते मात्र घरची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती.
त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र ते खचले नाहीत आणि शिक्षण सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी त्याकाळी घेतला. व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वप्रथम त्यांनी ऑटो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून मात्र त्यांना दुसऱ्या एका व्यवसायाची कल्पना सुचली.
ऑटो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करताना त्यांना शेळी पालन व्यवसायाची कल्पना सूचली. मात्र व्यवसायासाठी त्यांच्याकडे त्यावेळी भांडवल उपलब्ध नव्हते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाकडून कोणतीच मदत मिळणार नाही याची त्यांना कल्पना होती. मात्र यशस्वी तोच होतो जो कठीण प्रसंगावर यशस्वी मात करतो.
तेजस यांनी देखील या परिस्थितीवर मात केली आणि उसनवारीने पैसे घेऊन सुरुवातीला दोन आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या खरेदी केल्या. घराजवळ त्यांनी गोट फार्म सुरू केला आणि याला महाकाली गोट फार्म असे नाव दिले. गोट फार्मिंग चा व्यवसाय सुरू झाला आणि हळूहळू या व्यवसायातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.
सध्या त्यांच्या गोट फार्म मध्ये 350 शेळ्या आहेत. त्यांच्याकडे आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आहेत. ते दरवर्षी 100 शेळ्या विकतात. शेळीचे वजन 20 किलो झाले की मगच शेळीची विक्री केली जाते. दरम्यान शेळी विक्रीतून त्यांना दरवर्षी 50 ते 60 लाखांची कमाई होत आहे. आफ्रिकन बोअर सोबतच बिटल जातीच्या शेळ्यांचे देखील ते संगोपन करत आहेत.
ते शेळ्यांपासून कंपोस्ट खत देखील तयार करतात. कुक्कुटपालनाचा देखील व्यवसाय ते करतात. ते शेळ्यांसाठी एक एकर जमिनीत चारा पिकवतात. निश्चितच, दहावी पास तरुणाने शेळीपालनातून लाखो रुपयांची कमाई करून पुन्हा एकदा शेतीचे आणि शेतीपूरक व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.