Farmer Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये शेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आव्हानात्मक बनला आहे. यामुळे शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बदल करावे लागत आहेत. बाजाराचा अभ्यास करून शेतकऱ्यांना पिकाची निवड करावी लागत आहे. शेतकरी बांधव आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत असून नवनवीन प्रयोग अमलात आणत आहेत.
मराठवाड्यातील एका युवा शेतकऱ्याने असाच एक प्रयोग अमलात आणला आहे. थंड हवामानात वाढणारे स्ट्रॉबेरीचे पीक मराठवाड्यातील एका युवा शेतकऱ्याने यशस्वीरित्या उत्पादीत करून दाखवले आहे. मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्याच्या बारड येथील बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.
या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीच्या पिकातून चांगली कमाई केली असून सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याच्या प्रयोगाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. पारंपारिक शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती केल्यास चांगला फायदा मिळू शकतो असे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
खरेतर, बालाजी उपवार यांनी बी. एससी ऍग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. पण त्यांना नोकरी मिळू शकली नाही, म्हणून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाचा फायदा शेतीत करण्याच्या विचारातून त्यांनी शेतात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. बालाजी हे जवळपास पाच वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करत असून त्यांना यातून चांगली कमाई होत आहे.
मराठवाड्यातील उष्ण हवामानात देखील स्ट्रॉबेरीचे पीक यशस्वीरीत्या पिकवले जाऊ शकते हेच त्यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बालाजी यांना सुरुवातीला अनेकांनी वेड्यात काढले.
मराठवाड्यासारख्या उष्ण हवामानात स्ट्रॉबेरी सारखे पीक कसे उत्पादीत होणार? असे म्हणत अनेकांनी त्यांना हिणवले. परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग करून दाखवलाय.
स्ट्रॉबेरी शेती करताना योग्य नियोजन व संगोपन करत या शेतीतून चांगले उत्पादन घेत आहेत. यामुळे हि शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी देखील येत आहेत. यंदा बालाजी यांनी 15 गुंठे जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड केली.
यावर्षी त्यांनी उत्पादित केलेल्या स्ट्रॉबेरीला बाजारात चांगली मागणी असून तब्बल 400 रुपये प्रति किलो असा दर त्यांना मिळतोय. महत्वाचे म्हणजे त्यांच्या बांधावरच त्यांच्या मालाची खरेदी होत आहे.