Farmer Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध आव्हानांचा सामना करावा लागतोय. वेगवेगळ्या संकटांमुळे शेतीचा व्यवसाय हा खूपच अवघड बनत चालला आहे. अनेकदा शेतकऱ्यांना पिकासाठी केलेला खर्च देखील भरून काढता येत नाही ही वास्तविकता आहे. मात्र असे असले तरी काही प्रयोगशील शेतकरी आपल्या जिद्दीने शेतीमधून चांगले उत्पन्न मिळून दाखवतात.
असे शेतकरी इतरांना देखील प्रेरणा देतात. अहमदनगर जिल्ह्यातील अशाच एका अवलिया शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या जांभूळ लागवडीतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. एकेकाळी आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या या अवलियाने नोकरी सोडून शेतीचा निर्णय घेतला आणि आजच्या घडीला हा पट्ठ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना लाजवेल असे काम करत आहे.
यामुळे सध्या या अवलियाची नगरमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील वाकडी येथील संकेत काळे असे या अवलियाचे नाव. संकेत यांनी चार वर्षांपूर्वी नोकरी सोडून शेतीचा निर्णय घेतला. त्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी थायलंडमध्ये प्रामुख्याने उत्पादित होणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या जांभळाची लागवड केली. काळे यांनी आपल्या एक एकर जमिनीत 12 बाय 12 फूट अंतरावर 250 जांभळाच्या रोपांची लागवड केली. या पांढऱ्या जांभळाच्या बागेत त्यांनी विविध पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली आणि यातूनच या बागेचा खर्च वसूल केला.
चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये त्यांनी या जांभळाच्या बागेची लागवड केली होती आणि गेल्या वर्षीपासून त्यांना यातून उत्पादन मिळत आहे. गेल्या वर्षी त्यांना या बागेतून निवड अडीच लाख रुपयांचा नफा राहिला होता आणि यंदाही त्यांना या बागेतून चांगले उत्पन्न मिळणार आहे.
गेल्यावर्षी 250 पांढऱ्या जांभळाच्या झाडांमधून त्यांना अडीच लाख रुपयांची कमाई झाली होती. गेल्यावर्षी एका झाडापासून त्यांना सात ते आठ किलो एवढे फळ मिळाले होते यंदा मात्र एका झाडापासून जवळपास 15 ते 16 किलो फळे त्यांना मिळत आहेत. अर्थातच गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या कमाईचा आकडा हा मोठा राहणार आहे.
या 250 झाडांमधून यंदा जवळपास पाच ते सहा लाख रुपयांची कमाई काळे यांना होणार आहे. निश्चितच काळाच्या ओघात जर शेतीमध्ये बदल केला तर शेतीतून चांगली कमाई होऊ शकते हेच काळे यांच्या या उदाहरणावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.