Farmer Success Story : महाराष्ट्रात डाळिंब, द्राक्ष, केळी अशा विविध फळ पिकांची लागवड केली जाते. डाळिंबाबाबत बोलायचं झालं तर नाशिक जिल्हा हे खऱ्या अर्थाने डाळिंबाचे माहेरघर म्हणून उदयास आले आहे. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या चार तालुक्यांमध्ये म्हणजेच कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन होते. खरं तर कसमादे पट्टा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
येथील मालेगाव तालुक्यावर नेहमीच दुष्काळाचे सावट राहिले आहे. मात्र या दुष्काळीपट्ट्यातून उत्पादित होणारे डाळिंब सातासमुद्रापार पाठवले जातात. मालेगाव तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने उत्पादित केलेले डाळिंबही यंदा साता समुद्रा पार पाठवले गेले आहे. त्यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.
तालुक्यातील सातमाने, दाभाडी, वायगाव, कोठरे या पट्ट्यात डाळिंब हे महत्त्वाचे पीक आहे. येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण डाळिंबावर अवलंबून आहे. डाळिंबाने खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले आहे. डाळिंबाच्या कृपेमुळे टुमदार बंगला, फिरायला गाडी, शेतात सालगडी, बँक बॅलन्स या सर्व गोष्टी या भागातील शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत.
डाळिंबामुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊ केले आहे. यामुळे परिसराची अर्थव्यवस्था सुधारली आहे. दरम्यान याच तालुक्यातील सातमाने या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र पवार यांचे डाळिंब यंदा साता समुद्रा पार निर्यात करण्यात आले आहे.
रवींद्र पवार ज्यांना पंचक्रोशीत आबा म्हणून ओळखले जाते त्यांचे सुपुत्र निलेश पवार यांच्या मेहनतीने यंदा पवार कुटुंबीयांनी उत्पादित केलेल्या डाळिंबाला विक्रमी दर मिळवला आहे. गेल्या वर्षी दुष्काळ असतानाही डाळिंबाच्या बागेची योग्य पद्धतीने जोपासना करून पवार कुटुंबीयाने यावर्षी डाळिंबाचे विक्रमी उत्पादन पदरी पाडले आहे.
पवार यांनी उत्पादित केलेल्या डाळिंबाला तब्बल 211 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळाला आहे. त्यांचे डाळिंब मलेशिया आणि श्रीलंकेत निर्यात केले जात आहेत. खरे तर श्रीमान रवींद्र पवार हे एक आदर्श शेतकरी आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पवार यांनी उत्पादित केलेले डाळिंब मंत्रालयात देखील पोहोचले होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यामार्फत पवार यांचे डाळिंब मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांना सुपूर्द करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी पवार यांचे कौतुक केले आणि त्यांच्या डाळिंब शेतीची प्रशंसा केली होती.
दरम्यान यावेळी पवार कुटुंबियांनी आंबे बहारासाठी फेब्रुवारी महिन्यात पानगळ केली होती. यानंतर डाळिंबाला शेणखत, दुय्यम अन्नद्रव्य प्रत्येक महिन्याला बॅक्टेरिया दिले गेले होते. विशेष म्हणजे त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाचे यशस्वी उत्पादन मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रयोगाची मोठी चर्चा सुरू आहे.
निलेश पवार यांनी या बागेचे नियोजन केले होते आणि त्यांना याकामी त्यांचे पिताश्री कृषीभूषण रवींद्र पवार यांचे मोठे योगदान लाभले आहे. आबांच्या मार्गदर्शनातुन निलेश पवार यांनी निर्यातक्षम डाळींब उत्पादित केले असून त्यांच्या मालाला 211 रुपये प्रति किलो असा दर मिळालाय.