Farmer Success Story : कोणत्याही व्यवसायात जिद्द आणि सातत्य ठेवलं तर काय होऊ शकतं? याचं एक उत्तम उदाहरण समोर येत आहे ते जालना जिल्ह्यातून. खरंतर जालना जिल्हा म्हटलं म्हणजेच समोर येत ते दुष्काळाचे भयावय चित्र. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यावर नेहमीच दुष्काळाचे सावट राहिले आहे.
यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पण शेतकरी बांधव या अडचणीवर यशस्वीरित्या मात करत वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा प्रयोगाच्या माध्यमातून कायमच आपले नाव गाजवतात.
दरम्यान जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेती व्यवसायात जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मात्र तीन महिन्याच्या काळात तब्बल 55 लाखाची कमाई करून दाखवली आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र हे शंभर आणे खरे आहे.
जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 11 एकर शेतजमीनीतून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये 55 लाखाची कमाई करून दाखवली आहे. या शेतकऱ्याने मिरचीच्या शेतीतून ही लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.
कोण आहे तो अवलिया शेतकरी?
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील मौजे धावडा येथील प्रगतीशील शेतकरी इक्बालखाँ पठाण यांनी मिरचीच्या शेतीतून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे. पठाण साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे, ते गेल्या सोळा वर्षांपासून मिरचीची शेती करत आहेत. गेल्या वर्षापर्यंत ते चार ते पाच एकर मिरचीची लागवड करत असत.
गेल्या वर्षी मात्र परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांना मिरचीच्या शेतीतून चांगली कमाई झाली नाही. त्यांना मात्र चांगले उत्पादन मिळाले होते. यावर्षी अवकाळी पावसामुळे आणि गेल्या वर्षी मिरचीच्या पिकातुन चांगले उत्पादन मिळाले नसल्याने यंदा मिरचीची लागवड घटणार आणि बाजार भाव कडाडणार असा अंदाज त्यांनी बांधला.
यंदा मिरचीची लागवड कमी होणार हा त्यांचा अंदाज होता आणि यामुळे त्यांनी यावर्षी वाढीव क्षेत्रावर मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. ते दरवर्षी चार ते पाच एकरावर मिरचीची लागवड करत मात्र यंदा त्यांनी तब्बल 11 एकर जमिनीवर लागवड केली. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयोग त्यांच्यासाठी आजच्या घडीला फायदेशीर ठरला आहे.
खरंतर 11 एकरावर मिरची लागवड करणे आणि यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणे हे मोठे आव्हानात्मक आणि रिस्की काम होते. मिरचीच्या पिकातून कमाई होणारच याबाबत कोणतीच शाश्वता नव्हती. पण रिस्क घेतली आणि मिरचीची लागवड करून या पिकाला आतापर्यंत दहा ते अकरा लाख रुपये खर्च केले आणि आजच्या घडीला या पिकातून 55 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.
मिरचीच्या कोणत्या जातीची लागवड केली?
इक्बालखाँ यांनी सांगितले की त्यांनी एप्रिल 2023 मध्ये मिरचीची लागवड केली होती. मिरचीच्या चांगल्या सुधारित जातींची त्यांनी निवड केली होती. पिकाडोर, शिमला, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या वाणाची त्यांनी लागवड केली. एप्रिल महिन्यात लागवड केल्यानंतर अवघा एक ते दिड महिन्याच्या काळात मिरचीचे पीक उत्पादन देण्यासाठी तयार झाले.
मे अखेरपासून मिरचीच्या पिकाची हार्वेस्टिंग सुरू झाली. 25 मे ला पहिला तोडा काढण्यात आला. पठाण यांच्या पिकाडोर मिरचीला सुरुवातीला 65 रुपये, बलरामला 71 रुपये, शिमला मिरचीला 40 ते 45 रुपये असा बाजार भाव भेटला होता. आतापर्यंत पठाण यांना मिरचीच्या पिकातून आठ तोडे मिळाले असून आत्तापर्यंतच 55 लाख रुपये त्यांना उत्पन्न मिळाले आहे.
शिवाय शेतात तेजाफोर नावाच्या व्हरायटीची मिरची शिल्लक आहे. ही मार्चपर्यंत चालणार आहे. याची लाल मिरची निघते. हिला चांगला 200 रुपयांपर्यंत भाव मिळतो. यामुळे त्यांना अजून 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार अशी आशा आहे. म्हणजेच उत्पन्नाचा हा आकडा वाढून 75 ते 80 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे.
11 एकरात 80 लाख रुपयांपर्यंतची कमाई करणे ही काही साधीसुधी बाब नाही. पण मिरचीच्या पिकातून दरवर्षी कमाई होतेच याबाबत कोणतीच शाश्वता नसल्याचे पठाण यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेकदा तर घरातून पैसे खर्च करून पिकासाठी आलेला उत्पादन खर्च आणि मजुरीचा खर्च भागवावा लागतो असे त्यांनी सांगितले.
पण जर सातत्य ठेवले तर दर तीन वर्षांनी का होईना मिरचीच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले आहे. निश्चितच पठाण यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे यात शंकाच नाही.