Farmer Success Story : शेती हा निसर्गावर आधारित व्यवसाय आहे. यामुळे कधी काळ्या आईची सेवा केली तर भरभरून मिळतं तर कधी काळी आई पदरी निराशा देते. मात्र यशाची आणि अपयशाची फिकीर न करता फकीराप्रमाणे शेतात घाम गाळणारा बळीराजा कुणाकडेच तक्रार न करता आपल्या आयुष्याची घोडदौड सुरूच ठेवतो.
विशेष म्हणजे निसर्गाशी दोन हात करून, अनेकदा निसर्गाला पायचित करून आपला बळीराजा शेतशिवारातुन लाखोंची कमाई देखील मिळवतो. खऱ्या अर्थाने आयुष्य कसे जगतात हीच शिकवण जगाचा पोशिंदा आपल्याला देत असतो.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातून असेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. नाशिकमधील एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला बगल देत शेतीमध्ये एक नवीन प्रयोग करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे.
जिल्ह्यातील पालखेड मिरची येथील शेतकरी भारत बोळीज यांनी शेतीमध्ये बदल करत तैवान पेरूच्या लागवडीतून लाखों रुपयांची कमाई करून दाखवली आहे. या पेरूच्या पिकातून भारत यांना एकरी आठ लाखांची कमाई झाली असल्याने सध्या त्यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
खरेतर नाशिक जिल्हा हा द्राक्ष, डाळिंब आणि कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो. जिल्ह्यातील निफाड तालुका हा द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. मात्र या द्राक्षाच्या आगारात भारत यांनी तैवान पिंक जातीची पेरू शेती सुरू केली.
त्यांनी केलेला हा नवीन प्रयोग आता यशस्वी देखील झाला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या चार ते पाच वर्षात द्राक्ष शेतीत वेगवेगळी आव्हाने येत होती. यामुळे द्राक्ष शेतीत सातत्याने तोटा सहन करावा लागत होता.
मग काय शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करायचा असे भारत बोळीज यांनी ठरवले. यानुसार त्यांनी एक एकरात एक हजार सदाबहार तैवान पेरूच्या झाडांची लागवड केली. दहा बाय, चार फुटांवर या रोपांची लागवड केली. रोप लागवड केल्यानंतर सहा महिने त्यांची योग्य काळजी घेतली.
रोपांचा योग्य विकास झाला. मग त्यांनी झाडांची छाटणी केली. अशा तऱ्हेने त्यांनी झाडाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांनी लागवड केलेल्या पेरूच्या एका झाडाला ६० फळे लागली असून, प्रत्येकी एक पेरूचे फळ तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमचे भरत आहे.
म्हणजे एका झाडावर २० किलोपर्यंत माल मिळत आहे. अशा तऱ्हेने त्यांना या एक एकरावर सर्वसाधारण २० टनापर्यंत उत्पादन निघणार अशी आशा आहे. सध्या किलोला ५० रुपयाचा भाव मिळत आहे. म्हणजे भारत यांना या बागेतून १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
या बागेसाठी त्यांनी दोन लाख रुपयांचा खर्च केला आहे. अर्थातच खर्च वजा जाता त्यांना या हंगामातून आठ लाख रुपये मिळणार आहेत. एकंदरीत जर बाजाराचा अभ्यास करून, निसर्गाचा अभ्यास करून शेती केली गेली तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई होऊ शकते हेच भारत यांनी यावेळी दाखवून दिले आहे.