Farmer Success Story : गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. खरेतर, निसर्गाने शेतकऱ्यांना असा दणका देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधी सुद्धा निसर्गाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, दुष्काळ अशा वेगवेगळ्या संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. महत्त्वाचे म्हणजे जर या नैसर्गिक संकटांवर मात करून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन मिळवले तर उत्पादित झालेल्या मालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही.
मात्र अशा या परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करत सांगली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने लाखोंची कमाई काढली आहे. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले रामराव सिताराम पाटील या उच्चशिक्षित तरुणाने रताळ्याच्या शेतीमधून लाखोचे उत्पन्न मिळवले आहे.
या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने अवघ्या दीड एकरात साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यामुळे सध्या रामरावांची पंचक्रोशीत चांगलीचं चर्चा रंगली आहे. पाटील हे शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. पिकांची फेरपालट करत असतात.
यामुळे शेत जमिनीचा पोत सुधारतो. पाटील यांनी ऊस शेतीला पर्याय म्हणून भाजीपाल्यासह रताळे लागवड केली आहे. पाटील सांगतात की, रताळ्याची लागवड करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बियाण्यासाठी एक रुपयाही खर्च येत नाही.
कदाचित हे जगातील असे एकमेव पीक असावे ज्यासाठी बियाण्यावर खर्च करावा लागत नाही. हे पीक तीन महिन्यात तयार होते आणि यासाठी एकरी 73 हजारापर्यंतचा खर्च येतो. पाटील यांनी सुरुवातीला उसाचे पीक काढून रताळ्याच्या लागवडीसाठी जमीन तयार करून घेतली.
यानंतर बेड तयार केलेत आणि आपल्या एका मित्राकडून मोफत बियाणे आणले. ते सांगतात की, हे बियाणे कोणीही मोफत देते. मित्राकडून मोफत बियाणे आल्यानंतर त्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची लागवड केली. लागवड केल्यानंतर 2 आठवड्यांनी आळवणी केली.
तसेच कीटकनाशकाची एक फवारणी केली. रामराव यांनी लागवड केलेले रताळ्याचे पीक तीन महिन्यात तयार झाले. यातून त्यांना तब्बल 9 टन उत्पादन मिळाले. मुंबईमधील बाजारात 72 हजार रुपये प्रति टन असा भाव मिळाला.
म्हणून 60 गुंठ्यात लागवड केलेल्या या पिकातून त्यांना तब्बल साडेसहा लाखांची कमाई झाली.खरे तर या पिकातून चांगले उत्पादन मिळते मात्र बाजारभावात अगदीच कांद्याप्रमाणे लहरीपणा पाहायला मिळतो.
काही वेळा चांगला दर मिळतो तर काही वेळा अगदीच 15 ते 20 रुपये किलो या दराने मालाची विक्री करावी लागते. यामुळे बहुतांशी शेतकरी या पिकाकडे पाठ फिरवतात. परंतु या पिकाच्या लागवडीमध्ये सातत्य ठेवले तर नक्कीच या पिकातून लाखोंची कमाई होऊ शकते. रामराव यांनी हेच दाखवून दिले आहे.